32 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन.
गडचिरोली : - दि.11: 32 वे रस्ता सुरक्षा अभियान, दि. 18 फेब्रुवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली तसेच पोलीस विभाग (वाहतुक शाखा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज, दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली आर.एस. भुयार, यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा रॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली ते गांधी चौक या दरम्यान काढण्यात आली.
या रॅलीमध्ये कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गडचिरोली विवेक मिश्रा यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व विषद करत वाहन चालवतांना वेग मर्यादेचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. व भारतामध्ये अपघाताचे प्रमाण किती भयावह आहे याबाबत माहिती दिली. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याचे आवाहन केले. तर मो.वा.नि. एस.एन. उचगांवकर यांनी अपघात कसा टाळता येऊ शकतो याबाबत अत्यंत मौलीक मार्गदर्शन केले व अपघातग्रस्त व्यक्तींना तातडीची मदत मिळण्यासाठी 108 ॲम्बुलन्स सेवा व गोल्डन अवरचे महत्व पटवून दिले. तसेच डिफेंसिव्ह डाईव्हींगची माहिती दिली. प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथील श्री.साळुंखे यांनी भारतातील रस्ते चांगल्या प्रतीचे होत आहेत तसेच भारतातील वाहन संख्या झपाटयाने वाढत आहे असे नमुद केले व अपघाताची सांख्यिकी माहिती दिली. त्यामध्ये 80 टक्के अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे घडतात त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन अपघात टाळावा असे आवाहन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विवेक मिश्रा, उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आशिष आवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, गडचिरोली श्री. मंडलवार, मोटार वाहन निरीक्षक एस.एन. उचगांवकर व मोटार वाहन निरीक्षक सी.टी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा श्रीमती गोरे, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्री. साळुंखे सहभागी झाले होते. तर रॅली सुरळीतपणे व योग्य पद्धतीने पार पाडण्याकरीता मोटार वाहन निरीक्षक सी.टी. पाटील यांनी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरेाली येथील कर्मचारी व शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे निवेदन राष्ट्रीय सेवा योजना श्री. मेश्राम यांनी केले तर रॅलीमध्ये वाहतुक नियमांचे निवेदन उप प्रा. प.का. हर्षल बदखल यांनी केले असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा