छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

छल्लेवाडा (ता. अहेरी, जि. गडचिरोली) दि-19/07/2025 –महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करून तब्बल ३० वर्षे उलटली असताना, अजूनही अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू तयार करून खुलेआम विक्री केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर छल्लेवाडा येथील महिला प्रतिनिधींनी गावातील वाढत्या अवैध दारू विक्रीविरोधात उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही व्यक्ती गावातच साखर व गुळाचा वापर करून घरगुती पद्धतीने दारू बनवत असून, याशिवाय बाहेरगावाहूनही कंपनीत तयार होणारी दारू बेकायदेशीररीत्या आणून विक्री केली जात आहे. यामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, कौटुंबिक कलह, महिलांवर अत्याचार, शिवीगाळ आणि वृद्ध नागरिकांवर मारहाणीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
महिलांनी आपल्या निवेदनात मागणी केली आहे की, गावामध्ये अवैधरीत्या तयार आणि बाहेरून आणली जाणारी दारू तात्काळ बंद करण्यात यावी. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत दोषींवर कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तसेच गावात पोलीस गस्त वाढवावी, विशेष पथक तयार करून पाळत ठेवण्यात यावी आणि युवकांसाठी व्यसनमुक्ती व जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात यावीत.

सदर तक्रार देताना लक्ष्मी मडावी (सरपंच, ग्रामपंचायत रेपनपाल्ली), मनीषा ताटीवार, निर्मला रत्नम, नीला जनगम, नागमनी गद्दलपल्लीवार, दीपमाला दुर्गे, यशोदा दुर्गे, वच्छला दुर्गे, अम्मक्का आकुदारी, स्वाती भेडके यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. त्यांनी एकत्र येत पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

या तक्रारीमुळे गावातील महिलांचे सामाजिक जागरुकतेचे आणि बदलासाठीचे धाडस अधोरेखित होत आहे. आता पोलीस प्रशासन या गंभीर स्थितीकडे कसे प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.