शासकीय आरोग्य योजनांतर्गत रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर थेट फौजदारी गुन्हे: आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांचे कडक आदेश
गडचिरोली, (जिमाका) दि.१७: राज्य शासनाची 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' आणि केंद्र शासनाची 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग पूर्णतः कटिबद्ध आहे. "या योजनांतर्गत मिळणारे उपचार हा सामान्य जनतेचा हक्क आहे. जर कोणत्याही अंगीकृत रुग्णालयाने रुग्णांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली किंवा उपचारात हलगर्जीपणा केला, तर संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा," असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, गडचिरोलीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय व खासगी रुग्णालयांना शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
"शासकीय आरोग्य योजनांतर्गत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार हे पूर्णतः मोफत असणे अनिवार्य आहे. कोणत्याही तांत्रिक कारणास्तव किंवा औषधे-साहित्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैशांची मागणी करणे हे कराराचे उल्लंघन ठरेल. सर्व अंगीकृत रुग्णालयांनी शासन निर्णयाचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल." असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले आहे.
🛑 मुख्य निर्देशांचे पालन अनिवार्य:
शंभर टक्के मोफत उपचार: योजनेत समाविष्ट असलेल्या तपासण्या, शस्त्रक्रिया आणि औषधांसाठी रुग्णाकडून एक रुपयाही घेणे बेकायदेशीर आहे.
तातडीने FIR: जर कोणत्याही रुग्णालयाने 'पॅकेज' कमी असल्याचे सांगून पैशांची मागणी केली, तर संबंधित डॉक्टर आणि व्यवस्थापनावर त्याच दिवशी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नोंदणी कायमस्वरूपी रद्द: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांचे योजनेतील नोंदणी प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे केली जाईल.
वाढीव विमा कवच: बायपास सर्जरी, कॅन्सर उपचार यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आता ५ ते ६ लाखांपर्यंतचे कवच उपलब्ध आहे.
रुग्णांना आवाहन:
जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे या योजनांसाठी स्वतंत्र 'आरोग्य मित्र' कक्ष कार्यरत आहे. जर कोणत्याही पात्र रुग्णाला योजनेचा लाभ नाकारला जात असेल किंवा पैशांची मागणी केली जात असेल, तर त्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, गडचिरोली येथे लेखी तक्रार नोंदवावी. असे डॉ वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा