तुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणार

गडचिरोली, (जिमाका) दि.०१: कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने वडसा तालुक्यातील मौजा तुळशी येथे खरीप हंगामपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सगुणा भात लागवड तंत्रज्ञान (SRT), पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR), माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती प्रीती हिरळकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन केले. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, हिरवळीची व कंपोस्ट खते तसेच पीक फेरपालट यांचा अवलंब करण्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती देत शून्य मशागत पद्धतीचे फायदे स्पष्ट केले. आत्माचे बीटीएम व्ही. डी. रहांगडाले यांनी SRT पद्धतीमुळे नांगरणी, चिखलणी, रोवणी व इंधन खर्चात बचत होऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते, असे सांगितले. सहायक कृषी अधिकारी अतुल देशमुख यांनी DSR पद्धतीची माहिती देत या तंत्रज्ञानामुळे चिखलणी व रोवणीचा खर्च कमी होतो, असे स्पष्ट केले. कु. कल्पना ठाकरे यांनी माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून खत व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून उपस्थित शेतकऱ्यांनी SRT व DSR पद्धतीबाबत उत्सुकता व्यक्त केली तसेच लागवडीसाठी यंत्रांची मागणीही केली.

कार्यक्रमाला देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी, संचालक मेघनाथ दुनेदार, तुळशीचे सरपंच नाकाडे, उपसरपंच सुरेश तोंडफोडे, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्ही. डी. रहांगडाले यांनी केले, तर नितीन मुदामवार, अतुल देशमुख व सुरेश तोंडफोडे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.