“वी केअर अँड क्युअर” उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे VIA तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलांसाठी आयोजित उपचार शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.”

गडचिरोली, (जिमाका) दि.१८: “वी केअर अँड क्युअर” या उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दिनांक १७/०३/२०२६ रोजी व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ अॅसिटिक अॅसिड (VIA) या तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलांसाठी विशेष उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

VIA ही एक सोपी, किफायतशीर आणि प्रभावी तपासणी पद्धत असून ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या तपासणीत पॉझिटिव्ह निष्कर्ष आलेल्या महिलांना वेळेत उपचार मिळावेत आणि कर्करोग होण्यापूर्वीच आजारावर नियंत्रण मिळवता यावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.

सदर शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक तथा (राज्य आयएमए - एचपीव्ही लसीकरण, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग समिती अध्यक्षा) डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शिबिराचे आयोजन केले.

या शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील १३ महिलांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक त्या वैद्यकीय उपचारांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आखाडे व भूलतज्ज्ञ डॉ. साखरे यांनी उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार किलनाके तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पेड्डेला यांचे तसेच महिला वार्ड क्र. 10 व ओटी मधील स्टाफ विशेष सहकार्य लाभले. तसेच स्थानिक स्तरावर रुग्णांची निवड, समुपदेशन व उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. याशिवाय राजेंद्र अल्लीरवार, सुकेशनी आत्राम (चामोर्शी), श्रीदेवी तुप्पलवार (आष्टी) यांनी क्षेत्रीय समन्वयात सहकार्य केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी विभागातील डॉ. प्रेरणा राऊत, वैशाली बोबाटे, शिल्पा सरकार, शीतल काळबांधे तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मंगेश नैताम यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिरामुळे महिलांमध्ये गर्भाशय मुख कर्करोगाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून लवकर निदान व तात्काळ उपचार याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवून महिलांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोलीस–नक्षल चकमकीत तीन महिलांसह चार नक्षलवादी ठार – कोपर्शी जंगलातील मोठी कारवाई.

गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?

एटापल्ली ते वांगेतूरी बस फेरी मेढरी गावापर्यंत सोडण्यात यावे.भारतीय कम्युनिष्ट पक्ष (CPI) यांची मागणी.