राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ३७९ प्रलंबित आणि१७२ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली
गडचिरोली, (जिमाका) दि.१६: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय, गडचिरोली व गडचिरोली जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक १४ मार्च २०२६ रोजी या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. सदर लोकअदालतमध्ये एकूण प्रलंबित प्रकरणांपैकी तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कलम १३८ एन आय अॅक्ट अंतर्गत प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच दाखलपुर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकेची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्राहक न्यायालयातील प्रकरणे ठेवण्यात आली होती. गडचिरोली जिल्हयात एकुण १० पॅनल नेमण्यात आले. सदर लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण प्रलंबित प्रकरणांपैकी ३७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण २८८ प्रकरणे गुन्हा कबूली व्दारे निकाली निघाली. तसेच दाखलपुर्व प्रकरणांपेकी एकूण १७२ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकुण रूपये ३,४३,२६,२२१ ची वसुली झाली.
अनिरूद्ध लिं. टिकले, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली व अंकुश पुं. खानोरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे व्हि. एस. खोत, तदर्थ जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांनी पॅनल क्र. ०१ वर काम पाहीले व पॅनल क. ०२ वर एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) गडचिरोली, यांनी काम पाहिले. तसेच जिल्हा न्यायालय, गडचिरोली येथे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता विशेष न्यायालय कार्यरत ठेवण्यात आले होते. सदर न्यायालयात एस. बी. विजयकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी कामकाज पाहिले. सदर पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून प्रणय प्रदिप भैसारे, विधी स्वयंसेवक आणि पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून सचिन वामन ठाकरे, विधी स्वयंसेवक, यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर आखाडे, आणि जेष्ठ अधिवक्ता वृंद तसेच समस्त अधिवक्ता वृंद, न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली च्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा