महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणांना प्रारंभ रोजगार, बेरोजगारी व उद्योग क्षेत्रातील वास्तव स्थितीचे सर्वंकष चित्र समोर येणार

गडचिरोली, (जिमाका) दि.३०: केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सन २०१७ पासून नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षण तसेच सन २०१९ पासून सुरू असलेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन्ही महत्त्वपूर्ण सर्वेक्षणांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे.

आवर्ती श्रमशक्ती सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर यांसारख्या विविध श्रमसंबंधित निर्देशांकांचे त्रैमासिक व वार्षिक अंदाज प्राप्त होतात. या सर्वेक्षणातून कामगारांचे उद्योगनिहाय वितरण, रोजगाराची सद्यस्थिती, उत्पन्न, कामाचे तास तसेच वयोगट, लिंग, शैक्षणिक स्तर आणि ग्रामीण-शहरी भागानुसार श्रमबाजारातील स्थितीचे सविस्तर चित्र समोर येणार आहे. यावर आधारित वार्षिक अहवाल प्रकाशित केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील उद्योग आस्थापनांचे वार्षिक सर्वेक्षण हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या असंघटित क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी राबविले जाते. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनातही त्याचे लक्षणीय योगदान आहे. उत्पादन, व्यापार तसेच व्यापाराव्यतिरिक्त निवडक सेवा या तीन प्रमुख घटकांतील बिगर-कृषी असंघटित आस्थापनांचा या सर्वेक्षणात समावेश राहणार आहे. या माध्यमातून उत्पन्न, रोजगारनिर्मिती आणि क्षेत्रातील वाढीच्या शक्यता यांचा सखोल अभ्यास होणार आहे.

सदर सर्वेक्षणांद्वारे शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे देश, राज्य व जिल्हा स्तरावर नियोजन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील धोरणनिर्मिती आणि शाश्वत विकास ध्येयांच्या निर्देशांकांसाठीही ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या अनुषंगाने एप्रिल २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून गाव व शहरांमध्ये भेटी देऊन विहित नमुन्यात माहिती संकलित केली जाणार आहे.

कुटुंबांकडून देण्यात येणारी अचूक माहिती ही या सर्वेक्षणांच्या यशस्वितेसाठी अत्यंत महत्त्वाची असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.