स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना

त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय ठराव पावसाळी अधिवेशनात पारित करावा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची राज्य शासनाकडे मागणी

२८ मे रोजी देशभरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी होत असताना त्यांच्या राष्ट्रनिष्ठ कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दिनांक ५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र विधानसभेत त्यांनी सावरकरांना भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने मरणोत्तर सन्मानित करण्यासाठी मांडलेल्या अशासकीय ठरावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने शासकीय ठराव पारित करून केंद्र शासनाकडे पाठविण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची खंत व्यक्त करत, येत्या पावसाळी अधिवेशनात हा विषय प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री तसेच राजशिष्टाचार मंत्री यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

विधानसभेत ठराव मांडताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थोर कार्याचा सविस्तर आढावा घेतला होता. “सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रभक्तीच्या जागृतीसाठी आणि राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी समर्पित होते. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणाऱ्या अग्रगण्य क्रांतिकारकांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते,” असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे नमूद केले होते.

ते पुढे म्हणाले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केवळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, तर त्यांनी भारतीय समाजमनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या लेखणीतून आणि भाषणातून प्रकट झालेला राष्ट्रवाद आजही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांमधून देशप्रेम, आत्मविश्वास, त्याग आणि राष्ट्रहिताची भावना दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात सावरकरांच्या परदेशातील कार्याचाही उल्लेख केला होता. ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनांद्वारे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक आणि संघटनात्मक बळ दिले. लंडनमध्ये राहून ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध क्रांतिकारी विचारांची बीजे पेरण्याचे धाडस त्यांनी केले. त्यानंतरची अटक, मार्सेल्स येथे जहाजातून घेतलेली ऐतिहासिक उडी आणि अंदमानच्या सेल्युलर कारागृहात भोगलेली अमानुष शिक्षा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी पण तितकाच प्रेरणादायी अध्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.

सावरकरांनी सामाजिक समतेसाठीही मोठे कार्य केले. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक ऐक्य आणि विज्ञाननिष्ठ विचार यांचा पुरस्कार करत त्यांनी समाजसुधारणेची चळवळ उभी केली. राष्ट्रहित सर्वोच्च मानणारे त्यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले होते.

या अशासकीय ठरावावर उत्तर देताना संबंधित विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांनी राज्य शासनाच्या वतीने शासकीय ठराव पारित करून तो केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नसल्यामुळे सावरकर प्रेमी जनतेमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

उद्याच्या सावरकर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी राज्य शासनाला आवाहन केले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा आणि बलिदानाचा गौरव करणारा शासकीय ठराव येत्या पावसाळी अधिवेशनात तातडीने मांडून पारित करावा व केंद्र शासनाकडे पाठवावा. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे राष्ट्राला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या कार्याचा योग्य तो राष्ट्रीय सन्मान होणे ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक देशभक्त भारतीयाची भावना आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकाच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचे स्मरण करताना शासनानेही आपल्या आश्वासनाची पूर्तता करून राष्ट्रभावनेचा सन्मान करावा, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.