मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.

सिरोंचा, दिनांक 26/10/2025 :– सिरोंचा तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशनसमोर झालेल्या भीषण अपघातात पिंटीपाका येथील ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक किंवा सावधानता फलक न लावल्याने हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या निष्काळजीपणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार ए. सी. शेख कन्स्ट्रक्शन कंपनी, औरंगाबाद यांच्यावर ‘सदोष मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

दिशादर्शक फलक नसल्याने चालकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी बामणी गावाजवळ ट्रॅक्टर चालवित असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. घटनास्थळीच चालकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी सांगितले की, महामार्गावर धोक्याचे किंवा दिशा दर्शविणारे कोणतेही फलक नसल्याने चालकाला पुढील वळणाची कल्पना आली नाही, परिणामी अपघात झाला.

२ कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी

अपघातानंतर परिसरातील नागरिक व मृताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मृत चालकाच्या कुटुंबीयांना २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

संतोष ताटीकोंडावार यांनी सांगितले की, “राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना सुरक्षेचे नियम पाळले गेले नाहीत. ही केवळ निष्काळजीपणा नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे अत्यावश्यक आहे.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.