डिजिटल शेतीशाळेतून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार; शेतकऱ्यांना आधुनिक मार्गदर्शन८ एप्रिल रोजी ‘जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ विषयावर विशेष सत्र.
गडचिरोली, (जिमाका) दि. 07 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकरी व भूमिहीन कुटुंबांना सक्षम करणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देत शेती किफायतशीर करण्यावर भर दिला जात आहे.
बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने प्रकल्पांतर्गत “डिजिटल शेतीशाळा” हे अभियान स्वरूपात राबविण्यात येत असून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे.
“डिजिटल शेतीशाळा” हे एक ऑनलाईन व्यासपीठ असून, यामध्ये तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त तसेच पीकनिहाय उत्तम शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येते. झूम आणि यूट्यूब या माध्यमांद्वारे हे सत्र प्रसारित केले जाणार आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही सहज सहभाग घेता येणार आहे.
दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या सत्रात ‘जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क निर्मिती यासारख्या उपयुक्त तंत्रज्ञानांची माहिती दिली जाणार आहे.
ही डिजिटल शेतीशाळा गावपातळीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबांनी सहभागी होऊन या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा