जागतिक मौखिक आरोग्य महिन्यानिमित्त गडचिरोली येथे प्रभात फेरीद्वारे जनजागृती
गडचिरोली, (जिमाका) दि. ०७ : राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने दि. २० मार्च २०२६ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत “जागतिक मौखिक आरोग्य महिना” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दि. १ एप्रिल २०२६ रोजी मौखिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रभात फेरी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथून सुरू होऊन फुले वॉर्ड, सर्वोदय वॉर्ड, आरमोरी रोड, गांधी चौक मार्गे पुन्हा जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे संपन्न झाली. या फेरीदरम्यान मौखिक आरोग्य व तोंडाचा कर्करोग याबाबत घोषवाक्ये देत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली उपस्थित होते. तसेच डॉ. छाया उईके (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. माधुरी कीलनाके (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. बागराज धूर्वे (बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. मनीष मेश्राम (भिषक तज्ञ), डॉ. चंद्रशेखर शानगोंडा (जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी), डॉ. मृणाली रामटेक, डॉ. प्रेरणा राऊत (जिल्हा कार्यक्रम समन्वयक), डॉ. वंदना पेद्दीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सुहास गाडे यांनी सांगितले की, खराब मौखिक आरोग्याचा थेट परिणाम हृदयविकार, मधुमेह व श्वसनाच्या आजारांवर होऊ शकतो तसेच तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. “स्वच्छ तोंड, निरोगी शरीर” हे सूत्र लक्षात ठेवून प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याची नियमित काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कंकनालवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील राजूरकर, दिनेश खोरगडे, रीना मेश्राम, राहुल चावरे, तरुण पटले, खेमचंद तसेच नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले. या मोहिमेदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी नियमित मौखिक तपासणी करून घ्यावी व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा