डिजिटल शेतीशाळेमधून हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार; जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ऑनलाइन मार्गदर्शन; २८७ सत्रांची यशस्वी नोंद पुढील सत्र १५ एप्रिल २०२६ रोजी

गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करून शेती अधिक किफायतशीर करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात “डिजिटल शेतीशाळा” हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT) विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व जैविक शेतीविषयक जागरूकता वाढत आहे.

या डिजिटल शेतीशाळेमध्ये झूम (Zoom) व यूट्यूब (YouTube) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त पद्धती, हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान आणि जैविक शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित सत्रामध्ये “जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक घटकांच्या निर्मितीबाबत माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शेतीशाळांमध्ये शेतकरी, महिला शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेतीतील विविध समस्यांवर चर्चेद्वारे तसेच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून समाधानकारक उपाय सुचविण्यात आले.

महाकृषी खरीप कॅम्पेन अॅपच्या माध्यमातून या उपक्रमाची नोंद करण्यात आली असून दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी (सत्र-१) १४८ आणि ८ एप्रिल २०२६ रोजी (सत्र-२) १३९ अशा एकूण २८७ डिजिटल शेतीशाळांची ऑनलाइन नोंद झाली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व समूह सहाय्यक यांनी सक्रिय सहभाग घेतला.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या डिजिटल शेतीशाळांमधून दिले जाणारे हवामान अनुकूल तंत्रज्ञान व जैविक निविष्ठा निर्मितीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून उत्पादन खर्च कमी करण्यास आणि उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, पुढील सत्रांमध्ये दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी “एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM)” तसेच दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी “भात शेतीचे लागवड तंत्र” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शेतीशाळांना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.