परिक्षा परिसरात कलम १६३ अन्वये मनाई आदेश जारी
गडचिरोली, (जिमाका) दि.०२: राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA), नवी दिल्ली यांच्या मार्फत Joint Entrance Examination JEE (Main) २०२६ Session २ ही परिक्षा (Computer Based Test) दिनांक ०२, ०४, ०५, ०६, ०७ व ०८ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत जिल्हा मुख्यालयातील शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रावरील परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षार्थीना तणावमुक्त वातावरणात परिक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी म्हणून सदर परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत भारतीय न्याय संहितेचे कलम १६३ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता आवश्यक झाले आहे.
त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराअंतर्गत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टिने सदर परिक्षा केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत खालील बाबी / कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी करीत आहे.
निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स, व एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यकतीस/ वाहनास प्रवेशास मनाई राहील.
सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश परिक्षेच्या दिनांकास अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
सदर अधिसुचना परिक्षेच्या दिनांक ०२, ०४, ०५, ०६, ०७ व ०८ एप्रिल, २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.3० पर्यंत अमलात राहील. सदर अधिसुचना जिल्हादंडाधिकारी, अविश्यांत पंडा यांच्या सही शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा