हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी जिल्ह्यात १५ एप्रिलला 'डिजिटल शेतीशाळा'

एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मिळणार धडे

गडचिरोली, (जिमाका) दि.13 :गडचिरोली, दि. १३ (जिमाका): बदलत्या हवामानाचा शेतीला बसणारा फटका कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.०' अंतर्गत डिजिटल शेतीशाळा' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आगामी १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता 'एकात्मिक कीड व्यवस्थापन' या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी दिली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालविले जाणारे 'डिजिटल शेतीशाळा' हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तसेच भूमिहीन कुटुंबांना सक्षम करणे आणि कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देऊन शेती किफायतशीर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या शेतीशाळेच्या माध्यमातून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीकनिहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम (Zoom) आणि युट्यूब (YouTube) च्या माध्यमातून दिले जाते.

एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मिळणार धडे

बुधवार, १५ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्रात 'भाग-३: एकात्मिक कीड व्यवस्थापन' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक, लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्काचा वापर यांसारख्या प्रभावी आणि कमी खर्चाच्या उपाययोजनांची माहिती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत हे अभियान गावपातळीवर पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबांनी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता या डिजिटल शेतीशाळेत उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.