प्रधानमंत्री किसान सन्मान निधी: २२ व्या हप्त्याच्या लाभासाठी गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार शेतकरी पात्र
गडचिरोली,(जिमाका)दि.१३: अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते, याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तसेच जिल्ह्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांची स्थिती आणि २२ वा हप्ता
पी.एम. किसान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी देय असलेल्या २२ व्या हप्त्याकरिता एकूण १ लाख ५४ हजार पात्र शेतकरी निश्चित करण्यात आले आहेत. यातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील वितरण: चालू आर्थिक वर्षात २० व्या हप्त्यापोटी ७७,७१८ शेतकऱ्यांना १५ कोटी ५४ लाख ३६ हजार रुपये आणि २१ व्या हप्त्यापोटी ४४,२५० शेतकऱ्यांना ८ कोटी ८५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
योजनेच्या लाभासाठी महत्त्वाचे निकष
ज्या शेतकऱ्यांचे इकेवायसी पूर्ण आहे, बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि भूमी अभिलेख नोंदणी पूर्ण आहे, अशाच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दर चार महिन्यांनी दिला जातो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा