गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम; गडचिरोली जिल्ह्यातील १४ वर्षांच्या मुलींना मिळणार मोफत सुरक्षा कवच

गडचिरोली, (जिमाका) दि.०५ : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही आता गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध (Cervical Cancer) लढा देण्यासाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.

*महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) वाढते प्रमाण लक्षात घेता, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने या गंभीर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १४ वर्षे पूर्ण असलेल्या मुलींसाठी 'एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

 या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "हा आजार टाळता येण्यासारखा आहे आणि वेळेवर दिलेली लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. हे लसीकरण पूर्णपणे सुरक्षित असून सर्व शासकीय आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे."

या मोहिमेच्या नियोजनाबाबत माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे म्हणाले की, "मुलींचे भविष्य सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्यासाठी ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जिल्हा प्रशासनाकडून यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे."

तज्ज्ञांचे मत आणि आरोग्य आवाहन:

डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी): "एचपीव्ही लस ही नवीन नसून जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. ही लस ९३% ते १००% पर्यंत प्रभावी आहे. पालकांनी आपल्या मुलींचे नाव 'U-WIN' पोर्टलवर नोंदवून जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे."

"काही पालकांमध्ये लसीच्या दुष्परिणामांबाबत गैरसमज असू शकतात. मात्र, इतर लसींप्रमाणेच केवळ इंजेक्शनच्या जागी थोडे दुखणे किंवा हलका ताप येऊ शकतो, जो २-३ दिवसांत बरा होतो. या लसीमुळे भविष्यात प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही, उलट ती भविष्यातील आरोग्याचे रक्षण करते."

डॉ. वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक): "गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आजार आहे. नियमित तपासणी आणि वेळीच लसीकरण केल्यास या आजाराचा आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूचा धोका आपण लक्षणीयरीत्या कमी करू शकतो."

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

पात्रता: १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षांखालील मुली.

ठिकाण:
सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र.

डोस: भारत सरकारकडून दिली जाणारी ही लस अत्यंत प्रभावी असून त्याचा विहित डोस संरक्षण प्रदान करण्यास पुरेसा आहे.

नोंदणी: लसीकरणासाठी https://uwin.mohfw.gov.in/home या पोर्टलवर नोंदणी करता येईल किंवा जवळच्या आशा स्वयंसेविका/एएनएम यांच्याशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाने टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या सुरक्षा कवचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

एचपीव्ही' (HPV) लसीकरण मोहीम गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाची कंबर कसली आहे. डॉ. माधव शिंदे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी आणि डॉ. प्रफुल हुलके वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण दूरभाष्य प्रणालीद्वारे पार पडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.