जिल्हयात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : पोलीस अधिक्षक, गडचिरोली, यांचे पत्रान्वये जिल्ह्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा तसेच दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) सुरु झालेली आहे. दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पासुन मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु असून दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे. तसेच सी.पी.आय. (माओवादी) या नक्षल संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा माओवाद्यांतर्फे माहे फेब्रुवारी ते जून २०२६ या कालावधी दरम्यान टि. सी. ओ. सी. राबविण्यात येणार आहे. या टि. सी. ओ. सी. दरम्यानच्या कालावधीत माओवाद्यांद्वारे हिंसक घटना, शासकिय कार्यालय, बांबु / बिट डेपो, दुरध्वनी टॉवर्स इत्यादीची जाळपोळ, आयईडी, क्लोमोर, माईन्स प्लँट करणे, भुसरुंग स्फोट घडवून आणने, सुरक्षा दले पोलीस पथक तसेच पोलीस स्टेशन वर हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न करणे, रसत्यांवर अडथळे निर्माण करुन रहदारी बंद करणे त्याचप्रमाणे अॅक्शन टिम द्वारे महत्वाचे राजकीय व्यक्ती, पोलीस अधिकारी / अमलदार व इतर शासकिय अधिकारी तसेच पोलीसांना मदत देणारे बातमीदार यांना लक्ष करणे इत्यादी हिंसक कारवाया करण्याच्या प्रयत्न करु शकतात. त्याचप्रमाणे रेल्वे संपतीस सुध्दा धोका पोहोचविण्याची तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोचे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक ०७.०३.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २१.०३.२०२६चे २४:०० वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम३७ (१) (३) लागू होणेस विनंती केलेली आहे.
त्यामुळे सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दिनांक ०७.०३.२०१६ चे ००.०१ वा. ते दिनांक २१.०३.२०२६ चे २४:०० वा.पर्यंत या कालावधीत पुढील गोष्टींना मनाई केलेली आहे. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. व्यक्तिच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणीही मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक ०७.०३.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २१.०३.२०२६ चे २४:०० वा.पर्यंत जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक ०७.०३.२०२६ चे ००.०१ वा. ते दिनांक २१.०३.२०२६ चे २४:०० वा.वाजेपावेतो संपुर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली, अविश्यांत पंडा यांनी आदेशीत केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा