चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; आरोग्य प्रशासनाचा खुलासा
गडचिरोली, (जिमाका) दि.०५: चामोर्शी तालुक्यातील मौजा मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांना 'आयडीए' (IDA) मोहिमेअंतर्गत गोळ्या दिल्यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
तपासणीतील मुख्य निष्कर्ष:
मोहिमेची व्याप्ती: मुरखळा माल येथील जिल्हा परिषद शाळेतील १८० पैकी १७८ विद्यार्थी आणि ७ शिक्षकांना, तर लोकमान्य टिळक शाळेतील ३७ विद्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत गोळ्या देण्यात आल्या होत्या.
तपासणी अहवाल:
गोळ्या खाऊ घातल्यानंतर २४ तासांच्या आत कोणत्याही प्रकारची गुंतागुंत आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम दुमपट्टीवर यांनी सांगितले आहे.
आजारपणाचे कारण:
चौकशीअंती असे दिसून आले की, काही विद्यार्थ्यांमध्ये आढळलेली ताप, सर्दी आणि उलट्यांची लक्षणे ही गोळ्यांच्या सेवनामुळे नसून, सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे उद्भवू शकतो.
सद्यस्थिती:
बाधित १० विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांनी गोळ्या घेतल्याच नव्हत्या, उर्वरित १८ ते २६ फेब्रुवारी दरम्यान गोळ्या घेतल्या होत्या व त्यांना 2 मार्च पासून त्रास चालू झाला आहे, सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी आणि सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.
त्या गावचे 26 पाणी नमुने प्रयोगशाळा गडचिरोली येथे तात्काळ तपासणीसाठी पाठवले आहेत.
औषध साठ्याची माहिती:
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वापरण्यात आलेला औषध साठा (Tab Ivermectin, D.E.C. आणि Albendazole) जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली येथून प्राप्त झाला असून तो प्रमाणित आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र पेदद्ला यांनी पालकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उर्वरित सर्व विद्यार्थी सुरक्षित असून आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांचे आवाहन:
"मुरखळा माल येथील विद्यार्थ्यांबाबत समोर आलेली लक्षणे ही औषधांच्या दुष्परिणामातून नसून बदलत्या हवामानामुळे झालेली व्हायरल लागण असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्हा आरोग्य विभाग सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व औषध साठा पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य मोहिमांना सहकार्य करावे."
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा