14 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
गडचिरोली, (जिमाका) दि.०९ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिरुद्ध लिं. टिकले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे तसेच दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, प्ली बार्गेनिंगची प्रकरणे, १३८ एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे.
लोकन्यायालयात प्रकरणे तडजोडीकरीता ठेवतांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
लोकन्यायालयाच्या निवाडयाविरुद्ध अपील नाही. न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी-पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.
तरी सर्वांनी दिनांक १४ मार्च २०२६ रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली ए.पी.खानोरकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा