अखेर मागणीला यश : चंद्रपूर बस डेपोतुन सुटणार चंद्रपूर - एटापली बस, भाकपा.
अखेर मागणीला यश.
एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून मांडलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीकडे बस सुटावी ही मागणी फक्त वाहतुकीपुरती नव्हती, तर ती हजारो लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित होती.
आरोग्य उपचारासाठी चंद्रपूरला जाणाऱ्या शेकडो नागरिकांना दिवसभर तपासण्या, औषधोपचार आणि औपचारिकता पार पाडल्यानंतर परतण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसायचा. त्यामुळे वृद्धांना शहरात मुक्काम करावा लागे, महिलांना आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागे, तर आजारी रुग्णांना परक्या शहरात रात्री घालवावी लागे. ही अडचण केवळ खर्चिकच नव्हती, तर मानवी वेदनाही निर्माण करणारी होती.
याच पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पार्टीने ही मागणी ठामपणे मांडली. भाकपा जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सातत्यपूर्ण निवेदनं, आंदोलने आणि पाठपुरावा करून हा मुद्दा शासनदरबारी नेला. अखेर विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ गडचिरोली यांनी,लेखी पत्राद्वारे अधिकृत कळविले की ५ वाजता चंद्रपूरवरून एटापल्लीसाठी बससेवा सुरू करण्यात येईल. आदेशाची प्रत विभाग नियंत्रक चंद्रपूर व नागपूर यांना देखील पाठविण्यात आली आहे.
हा निर्णय म्हणजे फक्त एक बससेवा नव्हे, तर हजारो कुटुंबांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय आहे. जनतेच्या संघर्षानेच हा विजय शक्य झाला, कॉ. मोतकुरवार यांनी सांगितले.
एटापल्लीच्या जनतेच्या दैनंदिन जीवनातील मोठा अडथळा दूर झाला असून, आता वृद्ध, महिला, रुग्ण आणि लहान मुलांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा