गडचिरोलीत हेलिकॉप्टर ‘देवदूत’चा गौरव, पण लोह खनिज वाहतुकीमुळे बळी गेलेले नागरिक, रस्ते व दुर्घटनांचे काय?
अहेरी, 8 ऑगस्ट :- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक, पण कौतुकास्पद घटनेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टर उडवत, हृदयविकाराचा झटका आलेल्या हेडरी पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना तातडीने नागपूर येथे ‘एअरलिफ्ट’ करून त्यांचे प्राण वाचवले. या धाडसी कृतीमुळे प्रभाकरन यांच्यावर 'गडचिरोलीचा देवदूत' अशी उपाधी लावली जात आहे.
मात्र याच कंपनीच्या लोह खनिज वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे आलापल्ली–आष्टी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही, अद्याप प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळे अनेकदा रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही, परिणामी गंभीर रुग्णांचे प्राणही गेले आहेत. पण अशा घटनांना प्रसारमाध्यमे व अधिकाऱ्यांकडून अपेक्षित गांभीर्य दिले जात नाही. कंपनी संकटात मदत करत असल्यावर तिचे कौतुक होते, पण तिच्यामुळे निर्माण झालेल्या संकटांबद्दल मात्र मौन बाळगले जाते.
🌾 शेतकऱ्यांचे नुकसान, राजकीय मौन
खनिज वाहतुकीसाठी तयार केलेल्या मार्गांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर धूळ, माती, आणि अतिक्रमणाचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, या बाबतीत एकाही राजकीय नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नाही. "जिल्ह्यात लॉयड्ससाठी वेगळे नियम आणि सामान्य जनतेसाठी वेगळे कायदे का?" - असा सवाल आता जोरात उपस्थित होत आहे.
टीप :-
सदर बातमी स्थानिक नागरिकांकडून प्राप्त माहितीनुसार जनहितार्थ प्रसिद्ध केली जात आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रशासनाची बदनामी करण्याचा हेतू नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा