पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारींचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश.
गडचिरोली, दि. 28 ऑगस्ट : तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, याचा परिणाम म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आढावा बैठक घेऊन महसूल, पोलीस आणि इतर संबंधित विभागांना तातडीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांचे स्थलांतर आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.
आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, तेलंगणातून जवळपास ८ ते १० लाख क्युसेक पाणी आज रात्री १० ते ११ वाजेदरम्यान सिरोंचा तालुक्यात पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांतील नदीकाठी असलेल्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
नागरिकांना स्थलांतरित करा: सिरोंचा तालुक्यातील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना दवंडी देऊन सतर्क करण्यात यावे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
एसडीआरएफ पथके सज्ज: आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एसडीआरएफ (SDRF) पथके सिरोंचा आणि भामरागड तालुक्यांमध्ये तात्काळ तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी: नदी ओलांडून शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा इशारा देण्यासोबतच, आवश्यकतेनुसार सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत.
अफवांवर नियंत्रण: रात्रीच्या वेळी पाण्याचा विसर्ग होणार असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य सुविधांची तयारी: पूरस्थितीनंतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने पुरेसा ब्लिचिंग पावडर तसेच आरोग्यविषयक औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा जेणेकरून गरज पडल्यास नागरिकांना तातडीने मदत पुरवता येईल.
जिल्हाधिकाऱ्यांनी भामरागड तालुक्यातील इंद्रावती नदीच्या पातळीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली असून, तेथील नदीकाठी असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यास सांगितले आहे.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, तसेच दूरदृश्यप्रणांलीद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माधुरी किलनाके, सिरोंचा व भामरागड तालुक्यातील तहसीलदार व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा