सुरजागड–गट्टा रस्ता दुरुस्तीचा सवाल तीव्र; भाकपाचा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरण्याचा इशारा.
एटापल्ली | गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा हा सुमारे 20 किमी लांबीचा मार्ग अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रोज लाखो-कोट्यवधी रुपयांचे लोहखनिज याच मार्गाने बाहेर जात असूनही स्थानिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता मिळत नाही, याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) गडचिरोली जिल्हा कौन्सिलने बॅनर आंदोलनाची सुरुवात केली आहे.
जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सुरजागड येथे झालेल्या भव्य सभेत भाकपा नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शासनाने तातडीने रस्त्याचे काम मंजूर करून सुरू केले नाही तर हजारो नागरिकांसह नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येईल.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचा इशारा
भाकपा जिल्हा कौन्सिल सदस्य कॉ. सचिन मोतकुरवार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले, “आमचे खनिज तुम्हाला हवे, पण आमच्या हक्काचा रस्ता मात्र नको — ही भूमिका अस्वीकार्य आहे. लाखो रुपयांचे खनिज रोज जात असताना स्थानिकांच्या जीविताची किंमत शासनासाठी शून्य आहे. हा संघर्ष केवळ रस्त्यासाठी नाही, तर आदिवासी जनतेच्या जगण्याच्या हक्कासाठी आहे.”
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व गावांच्या प्रवेशद्वारांवर लावलेल्या बॅनरमधून मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार व खासदारांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत – “मोठे उद्योग सुरू करायला तुम्ही येता, पण आमचा सुरजागड–गट्टा रस्ता अजूनही धुळीत का?”
दररोजचा प्रवास म्हणजे जीवाशी खेळ
पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि वर्षभर खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण व स्थानिक नागरिकांना प्रचंड हाल सहन करावा लागतो. अपघातांचा धोका कायम असून शैक्षणिक व आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होत आहे.
पुढील टप्पा नागपूर
भाकपा जिल्हा कौन्सिलने जाहीर केले की, हे आंदोलन केवळ प्रारंभ आहे. शासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील टप्प्यात हजारो नागरिकांसह नागपूर गाठून मुख्यमंत्री निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल आणि रस्ता पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा