चपराळा अभयारण्याजवळ महामार्गाची चाळण, लोह खनिजाच्या अतिभार वाहतुकीमुळे रस्ता उध्वस्त; विद्यार्थी व नागरीक त्रस्त!

गडचिरोली (मु.सं) - दिनांक - 07 जुलै 2025 :- गडचिरोली जिल्ह्यातील लगाम नाका ते नागेपल्ली या सुमारे 25 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C चा अक्षरशः कणा मोडलेला असून, रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या मार्गावरून लायड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या जड वाहनांतून मोठ्या प्रमाणावर लोहखनिजाची अतिभार वाहतूक सुरू असून, त्यामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे तयार झाले आहेत. सदर खड्ड्यांमुळे प्रवाशांचे व स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणे म्हणजे मृत्युच्या खाईत उतरण्यासारखे झाले आहे.
सदर महामार्ग चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या प्रवेशद्वारालगतून जातो. हा मार्ग वन्यजीव संरक्षित क्षेत्र, शालेय वाहतूक, रुग्णवाहिका आणि खाजगी वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, लायड मेटल अँड एनर्जी लि. कंपनीच्या जड वाहनांद्वारे होणाऱ्या लोहखनिजाच्या अतिभार वाहतुकीमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी या मार्गावरून जाणाऱ्या शालेय वाहने, रुग्णवाहिका, खासगी व शासकीय वाहने यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र रस्त्याची अवस्था पाहता अपघाताची शक्यता अधिक असल्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
या रस्त्याचे कंत्राट श्री स्वामी समर्थ इंजिनीअर्स लि. या कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदाराचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत आणि अपघाताची शक्यता वाढली आहे. अभयारण्य परिसर असल्याने हे ध्वनीप्रदूषण आणि धूळ वन्यप्राण्यांच्या जीवनावरही परिणाम करत आहे.

स्थानिकांची संतप्त मागणी
1) श्री साई समर्थ इंजिनीअर्स लि. कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी.
2) लायड मेटल कंपनीच्या अतिभार वाहतुकीवर तातडीने बंदी आणावी.
3) सदर रस्त्याची तात्काळ डागडुजी करून वाहतुकीसाठी योग्य बनवावे.
4) चपराळा अभयारण्याच्या जैवविविधतेच्या रक्षणासाठी स्वतंत्र रस्ता विकसित करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.