गावागावांत पसरले घाणीचे साम्राज्य; मल्लेरा ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ.मुलचेरा तालुक्यात चाललंय तरी काय ?
मुलचेरा:तालुक्यातील मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध गावांत अस्वच्छता,सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.घराच्या परिसरात तसेच वस्त्यातील नाल्यांची दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावाने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.विशेष म्हन्हे ग्रामपंचायत प्रशासनाने जबाबदारी झटकल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.
एकीकडे गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. किंबहुना रुग्ण दगावत आहेत. हिवतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे.आरोग्य विभाग डोळ्यात तेल टाकून सेवा देत आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविताना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः लक्ष देऊन आहेत. मात्र,ग्रामपंचायत कार्यालय स्वतः आपल्या अधिनिस्त गावांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असेल तर गावकऱ्यांनी काय करावं ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मल्लेरा ग्रामपंचायत अंतर्गत मल्लेरा, मोहूर्ली,रेंगेवाही,लोहारा,कोडसापूर,
गंगापूर रिट आदी गावांचा समावेश आहे.२०११ नुसार या ग्रामपंचायतची लोकसंख्या २ हजार ५४६ एवढी आहे.मात्र,ग्रामपंचायत प्रशासनातर्फे या गावांत विकास कामे तर सोडा,किमान स्वच्छतेसाठीही पुढाकार न घेतल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.ग्रामपंचायत प्रशासन काही ठेकेदारांशी संगनमत करून गावांत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम केले. मात्र,अल्पावधीतच दुरवस्था झाल्याचे बोलले जात आहे.ज्या कामात आर्थिक फायदा आहे असेच काम सुरू असून इतर कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
ई-कचरा गाडी कोंडवाड्याच्या चिखलात
ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून ई- कचरा गाडी खरेदी केली.त्याचा उपयोग सुका आणि ओला कचरा वाहून नेण्यासाठी होईल असा विश्वास गावकऱ्यांना होता.मात्र सध्या ई कचरा गाडी मलेरा गावातील कोंडवाड्याच्या चिखलात धूड खात असल्याचे आढळून आले. नेमकं ई कचरा गाडी घेण्याचा उद्देश काय ? त्याचा वापर का होत नाही ? याचे उत्तर गावकऱ्यांना अजूनही मिळाले नाही.विशेष म्हणजे मागील दोन ते तीन वर्षात या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे बोलले जात आहे.रंगरंगोटी वर देखील मोठी निधी खर्चिल्याची माहिती पुढे येत आहे.मात्र नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या शुद्ध पाणी,नाले सफाई,कचरा व्यवस्थापन,विविध गावातील चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करण्याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने अक्षरशः5 दुर्लक्ष केले आहे.मागील तीन वर्षात खर्च झालेल्या निधीची योग्य चौकशी करावी.अशी मागणी आता जोर धरू लागली.
दोन ग्रा.पं.चा प्रभार मात्र अधिकारी कुठेच आढळेना.
येथील ग्रामपंचायत अधिकारी जे. के. कुमरे ७ जुलै २०२१ रोजी याठिकाणी रुजू झाले.त्यांच्याकडे चुटूगुंटा ग्रामपंचायतीचा देखील अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला.मात्र,त्यांचा दोन्ही ग्रामपंचायत मध्ये थांगपत्ता नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.वास्तविक पाहता गावपातळीवर काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. मात्र,सदर ग्रामपंचायत अधिकारी आष्टी येथूनच दोन ग्रामपंचायतीचा कारभार चालवित असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा