गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथील लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन व भूमिपूजन.
दिनांक:- २२ जुलै २०२५
गडचिरोली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन झालेले प्रकल्प: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेडरी येथील ५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी ते कोनसरी अशी ८५ किलोमीटर लांबीची आणि १० मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन आणि कोनसरी येथील ४ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा पेलेट प्रकल्प यांचे उद्घाटन झाले. हे प्रकल्प लॉयड्स मेटल्सच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ करतील.
भूमिपूजन झालेले प्रकल्प: यावेळी कोनसरी येथील ४.५ मिलियन टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प (Integrated Steel Plant), कोनसरी येथील १०० खाटांचे रुग्णालय, कोनसरी येथील सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात आले. हे प्रकल्प केवळ औद्योगिक वाढीसाठीच नव्हे, तर स्थानिक लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि निवासासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरतील.
या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, अरविंद सावकार पोरेड्डवार व इतर मान्यवर उपस्थित.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा