गट्टा ते सुरजागड रस्त्याच्या दयनीय अवस्थेवरून भाकपाचा सरकारला इशारा!

एटापल्ली, 15 जुलै 2025 (टाईम्स ऑफ गडचिरोली):
गटटा ते सुरजागड दरम्यानचा सुमारे ३० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला मुख्य रस्ता आज मृत्यूच्या दारापर्यंत पोहचला आहे. यानंतर या मार्गाकडे शासनाने डोळा फिरवलाच नाही. खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता आज गावकऱ्यांसाठी संकट बनला असून, रोजच्या रोज अपघात होत असून रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकत नाही. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतंय.

"हा विकास आहे की शोषण?" असा जळजळीत सवाल करत भाकपाच्या राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी तीव्र शब्दांत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "आम्हाला केवळ आश्वासनं मिळाली, विकास नाही. जल, जंगल आणि जमिनीच्या नावावर भांडवलदारांचे हितसंबंध वाढवले जात आहेत, तर स्थानिक जनता मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करतेय. ही व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे."

ग्रामस्थांचा आक्रोश :
गटटा, जांबिया, गर्देवाडा, मेंढरी, वांगेतुरी अशा गावांतील ग्रामस्थांनी शेकडो वेळा निवेदने दिली आहेत, पण अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही झाली नाही. वाहनचालक, दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. रुग्णवाहिका वेळेवर पोहचू शकत नाही, मृत्यूची शक्यता वाढली आहे.

"रस्ते केवळ खदानींपर्यंतच?"
सरकारने रस्त्याचे डांबरीकरण व देखभाल केवळ खाजगी कंपन्यांच्या खदानींपर्यंत मर्यादित ठेवले आहे. जनतेच्या दृष्टीने असलेली जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या रस्त्यांचा दर्जा दयनीय आहे. यावर कॉ. रितेश जॉई (ऑल इंडिया आदिवासी महासभा) म्हणाले, "सरकारी योजना भांडवलदारांपुरत्या, आदिवासी जनता मात्र कायम उपेक्षित!"

संघटनांचा संताप उफाळला:
रस्त्याच्या प्रश्नावरून आता एकजूट होऊन जनसंघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे.

कॉ. रामदास उसेंडी (खेतमजदूर युनियन): "सरकार केवळ कागदावर योजना चालवते, प्रत्यक्षात काहीही नाही."

कॉ. सतू हेडो (किसान सभा): "रस्ता नसल्याने शेतीमाल आणि वनउपज विकायला नेणेही कठीण!"

कॉ. सुरज जकुलवार (जिल्हा संयोजक, AIYF): "हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, तर जगण्याच्या हक्काचाही आहे."


लवकरच तीव्र जनआंदोलन:
भाकपाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर तातडीने रस्त्याच्या कामांची सुरुवात झाली नाही, तर गावोगाव दौरे करत संपूर्ण जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.

"रस्ता ही मागणी नव्हे, हक्क आहे – संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार!"
सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, गडचिरोलीत पुन्हा एकदा संघर्षाचा वणवा पेटण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.