एटापल्ली नगर पंचायतच्या निष्क्रीय जलशुद्धीकरण संयंत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. मनिष दुर्गे यांचा हल्लाबोल; चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी.
एटापल्ली दिनांक 14/07/2025 – एटापल्ली नगर पंचायत हद्दीतील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बसविण्यात आलेली सुमारे ७० लाख रुपयांची जलशुद्धीकरण संयंत्रे सध्या निष्क्रिय आणि काही ठिकाणी गायब झाल्याने स्थानिक नागरीकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री मनिष दुर्गे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे चौकशीसाठी लेखी तक्रार सादर केली आहे.
सदर प्रकल्पाअंतर्गत २०१९-२०२० मध्ये १० जलशुद्धीकरण यंत्रे प्रत्येकी ७ लाख खर्च करून बसविण्यात आली होती. मात्र सध्या बहुतांश संयंत्रे धुळखात पडलेली असून, काही ठिकाणी तर पूर्णतः अदृश्य झाली आहेत. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.
श्री. दुर्गे यांनी आपल्या निवेदनात कंत्राटदाराची ५ वर्षांची देखभाल जबाबदारी असूनही नगर पंचायतने कोणतीही देखभाल करून घेतलेली नाही, तसेच यंत्रे गहाळ झाल्याबद्दल कोणतीही पोलिस तक्रार दाखल न झाल्याची गंभीर बाब उपस्थित केली आहे.
विशेषतः प्रभाग क्र. २ (गोटुल भवन, जिवनगट्टा) येथील संयंत्राजवळ नाली घाणीने भरलेली असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पासंदर्भातील कोणतीही माहिती जिल्हा सहआयुक्त (नपाप्र), गडचिरोली कार्यालयाकडे न पाठवणे देखील व्यवस्थापनातील दुर्लक्ष स्पष्ट करणारे आहे.
श्री. मनिष दुर्गे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत –
1. संयंत्र प्रकल्पाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी.
2. गहाळ संयंत्र प्रकरणी जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
3. नागरिकांना तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा.
4. जिल्हा पातळीवर सविस्तर आर्थिक ऑडिट करण्यात यावे.
या निवेदनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते पाचू भाऊ मंडल, प्रशांत कोकुलवार, अनिकेत हिचामी (युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष), अर्शद शेख आणि शंतनू ऊईके उपस्थित होते.
एटापल्ली नगर पंचायतमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता या प्रकरणातून पुढे येत असल्याने नागरिकांच्या मागणीला प्रशासन काय प्रतिसाद देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा