आदिवासींसाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश
गडचिरोली, दि.26:
आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हितासाठी
राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज यंत्रणेला दिले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, अहेरी येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री उईके बोलत होते.
याबैठकीला आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रकल्प अधिकारी कुशल जैन (अहेरी),
रणजित यादव (गडचिरोली) व नमन गोयल (भामरागड), आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर
चव्हाण, आदिवासी विकास मंडळाचे महाव्यवस्थापक किरण गाडे यांच्यासह अंबरीश आत्राम, प्रशांत वाघरे,
प्रकाश गेडाम व डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्री उईके यांनी ठक्कर बाबा योजना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, बिरसा मुंडा कृषी
क्रांती योजना, घरकुल योजना, दुधाळ जनावर वाटप योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम जनमन
योजना, संजय गांधी निराधार योजना आणि आयुष्यमान भारत योजना आदींचा आढावा घेतला. कोणताही
आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, यासाठी दक्षता घेण्याचे त्यांनी
सांगितले.
पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि रुग्णवाहतूक सुविधांचे नियोजन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच
आदिवासी आश्रमशाळांमध्ये कोणत्याही अनुचित प्रकाराला पायबंद घालण्याचे निर्देश देताना, विद्यार्थ्यांचा व
पालकांचा विश्वास संपादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आश्रमशाळांतील प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी
प्रयत्न करण्याचे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुप्त कौशल्याचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी
उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने काम करावे, असेही मंत्री उईके यांनी स्पष्ट केले.
एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन
मंत्री अशोक उइके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या बैठकीस तहसीलदार चेतन पाटील व विविध तालुकास्तरीय अधिकारी देखील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा