31 डिसेंबर 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
गडचिरोली,दि.30: कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये "ओमिक्रॉन" ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये/ रहिवाशांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठया प्रमाणात एकत्र न येता या वर्षी 31 डिसेंबर 2021 ( वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने गृह विभागाचे शासन परिपत्रकान्वये पुढील मार्गदशक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी व दि. 1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे. तसेच 25 डिसेंबर 2021 पासून रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2021 व नूतन वर्ष 2022 चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्के च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व Social Distancing राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जुंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा