महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते महिलांसाठीच्या ‘वुलू’ ॲपचे लोकार्पण.
महिलांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा.
मुंबई : - दि. 8 : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ‘वुलू’ (WOLOO) ॲपचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप अतिशय नाविन्यपूर्ण असून महिलांच्या उपयोगी येणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲपचे निर्माते मनीष केळशीकर आदी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या विशेष सूचनेनुसार खासगी कंपनीने या ॲपची निर्मिती केली आहे. वुलू या ॲपद्वारे शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रारंभी मुंबईतील 1500 हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहांचा वापर करता येणार आहे. हे ॲप विनामुल्य असून महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृहांची उपलब्धता करुन देणार आहे. राज्यात महिलांसाठीच्या स्वच्छ प्रसाधानगृहांअभावी अनेकवेळा महिलांची गैरसोय होते. सुरुवातीला शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे ॲप विनामूल्य वापरता येणार असून सर्वसामान्य महिलांसाठी 99 रुपये प्रतीमाह सबस्क्रिप्शन घेऊन वापर करता येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर सहजरित्या उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वुलू ॲपने प्रमाणित केलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहांची यादी या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
वुलू ॲप हा पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम असून जागतिक महिला दिनानिमित्त याचे लोकार्पण होत आहे. याबाबत आनंद व्यक्त करुन या ॲपचा महिलांनी वापर करावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांनी यावेळी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा