गडचिरोली शहरात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर.
गडचिरोली : - ता. १३ : जंगलातील अतिशय लाजाळू व अतिदुर्मिळ खवल्या मांजर (पँगोलिन) शनिवार (ता. १२) गडचिरोली शहरातील सर्वोदय वॉर्डात रात्री ८ वाजताच्या सुमारास आढळून आले. त्याला वनविभागाने ताब्यात घेऊन रविवारी निसर्गमुक्त केले.
गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावरील एआरबी ट्रॅव्हल्सच्या मागील परिसरात खोब्रागडे नावाच्या वृद्ध महिलेच्या अंगणात खवल्या मांजर आढळले. त्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून या दुर्मिळ प्राण्याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी झाल्यानंतर रविवारी त्याला जंगलात सोडण्यात आले.
यावेळी गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कैलुके, क्षेत्र सहायक जेनेकर, सर्पमित्र अजय कुकडकर, क्रेन्स संस्थेच्या सचिव अंजली कुळमेथे आदींची उपस्थिती होती.
दुर्मिळ खवल्या मांजर अतिशय दुर्मिळ असून निशाचर प्राणी आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात आराम करते व रात्रीच्या सुमारास बाहेर निघते. मुंग्या व वारूळातील वाळवी हे त्याचे आवडते खाद्य आहे. त्यांना ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. त्या अंगावर जाडसर खवले असल्यानेच त्याला खवल्या मांजर म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या धोक्याची चाहूल लागताच ते आपल्या शरीराचे वेटोळे करून घेते, हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा