गडचिरोली :- सुरजागड लोहखानीतील जड वाहतुकीमुळे दक्षिण गडचिरोलीतील नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असतांना एका गरीब आदिवासी महिलेवर ट्रक चालकाने ट्रकमध्येच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक असल्याच्या चर्चेने संतापात आणखीनच भर पडली आहे. संतलाल जयराम कोठारी (३१ वर्ष, रा- बुरसातकल, ता-गुरुकुंडल, जि- कांकेर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही दिनांक- २९ सप्टेंबरला दुपारी एटापल्ली येथील बँकेतुन निराधार योजनेची रक्कम काढण्याकरिता जात असतांना येलचिल गावानजीकच्या कल्लेम फाट्याजवळ आरोपी संतलाल कोठारी याने एटापल्लीला सोडतो असे सांगून तिला ट्रकमध्ये बसविले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने कसेबसे अहेरी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंदविल्यानंतर पोलीसांनी संतलाल कोठारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास दिनांक- ६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे प्रकरणाचा तपास करीत आहेत....