नवा भारत मातृशक्तीचा असेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा दीक्षांत समारोह
मुंबई : - दि. 17 : प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्याने आपण उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात 5 सुवर्णपदके मुले तर 50 सुवर्णपदके मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल, भगिनीशक्तीचा असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
 
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 70 वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. 17) झाला.
 
यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री मुकुल कानिटकर, विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्रकुलगुरू विष्णु मगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  

एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे. स्नातकांनी आपल्या डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये, सदाचार, त्याग व सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्र उत्कर्ष साधला जाईल. असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
 
दीक्षांत समारोहात स्नातकांना उद्देशून मातृ देवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्रदेवो भव हा उपदेश दिला जातो याचे स्मरण देऊन राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, या उपदेशामध्ये मातृशक्तीला अग्रमान दिलेला आहे. आपल्या देशात कुमारी पूजा केली जाते. बंगालमध्ये तर सुनेला देखील बहुमाता म्हटले जाते, ही भारताची परंपरा आहे. प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गेचे रूप असून मुलींमध्ये सेवाभाव, वात्सल्य, त्याग व समर्पण भाव निसर्गदत्त असतो. त्यामुळे प्रत्येकाने मातृशक्तीला जागृत केल्यास आपल्याला सर्व क्षेत्रात सफलता मिळेल व त्यातून समाज व देश प्रगती करेल, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
 
दीक्षांत समारोहात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्र, आंतरशाखीय अध्ययन या शाखांमधील १६४८३ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका व आचार्य पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी 120 विद्यार्थ्यांना 73 सुवर्ण पदके, एक रौप्य पदक व 218 पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कुलगुरू शशिकला वंजारी यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. सुनील वाघमारे यांनी आभार प्रदर्शन मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.