वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.

 अहेरी :-, १० जुलै २०२५ –
अहेरी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनसंवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविकास महामंडळाच्या (FDCM) दोन कर्मचाऱ्यांनीच हरिणाची शिकार करून मटन शिजवून खाल्ल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा वन विभागाच्या पथकाने कारवाई करत दोघांना रंगेहात ताब्यात घेतले.

सदर कारवाई आलापल्ली वनविभागाच्या हद्दीत करण्यात आली असून, ही घटना वनविकास महामंडळावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वन्यजीवांचे संरक्षण ही ज्या विभागाची प्रमुख जबाबदारी आहे, त्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून अशी बेकायदेशीर व अमानुष कृत्ये घडत असतील तर सामान्य जनतेने विश्वास ठेवावा तरी कुणावर, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अटक केलेले दोघे कर्मचाऱ्यांपैकी एक कंत्राटी असून या प्रकरणात इतर कर्मचारीही सामील असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र जबाबदारी टाळण्यासाठी हा प्रकार एका कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या नावावर लादण्याचा प्रयत्न FDCMच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांकडून होत असल्याचेही बोलले जात आहे.

उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी पदभार स्वीकृत केल्यानंतर वन्यजीव तस्करी व जंगलसंपत्तीचे रक्षण अधिक प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षेवर खरे उतरत त्यांनी या गंभीर प्रकरणात कडक कारवाई करत दोषींना अटक केली आहे.

सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत याचे धागेदोरे जात आहेत काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही केवळ सुरुवात आहे की यामागे मोठा रॅकेट कार्यरत आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

वनविभाग या प्रकरणात पारदर्शक व कठोर भूमिका घेईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून इतरांनाही याचे चाप लावणं गरजेचं असल्याचं मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.