गडचिरोली जिल्ह्यासाठी पदविधर निवडणूक वेळेत बदल सकाळी 7.00 ते 3.00 वा. पर्यंत मतदान.
गडचिरोली : - दि.25: नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेत गडचिरोली जिल्ह्याकरीता बदल केलेला असून तो मतदानाच्या दिवशी, दि. 01 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच मतदान कसे करावे हे पुढील प्रमाणे कळविण्यात आले आहे. केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदविणे अनिवार्य आहे. इतर कोणत्याही शाई, पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतपत्रिकेच्या शेवटच्या पसंतीक्रम' या स्तंभात इंग्रजी किंवा मराठी किंवा रोमन भाषेत १ हा अंक लिहून मत नोंदवावे. या १ ला अवतरण चिन्ह/कंस इत्यादी करू नये. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर अंकात नोंदवू शकता. आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील 'पसंतीक्रम' या स्तंभात २,३,४ इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे अंकात नोंदवू शकता. एका उमेदवाराच्या नावासमोरील स्तंभात एकच पसंतीक्रम अंक नोंदवावा. तो पसंती क्रमांक इतर कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ इंग्रजी किंवा मराठी किंवा रोमन भाषेत 1,2,3/1,2,3/ I,II,III इत्यादी अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन, इत्यादी शब्दांमध्ये नोंदविण्यात येऊनयेत. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द/चिन्ह लिहू नये. तसेच मतपकत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवतांना टिकमार्क ", " किंवा क्रॉसमार्क "X" अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अनिवार्य आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
तसेच मतदानाकरीता निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे 9 ओळखपत्रांचा वापर करता येईल. आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगीऔद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, मा. खासदार / मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर/ शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/ शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विश्वविद्यालयाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा